लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी खुलताबाद
खुलताबाद शहरातील जुना बसस्थानक परिसरात चोरट्यांनी दोन दुकानांचे शटरचे कुलूप तोडून दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. जफर कापड दुकान व सना मेडिकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरटे दुकानातील रोकड लंपास झाले . ही चोरी सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे.
जुना बसस्थानक परिसरात निसार खान सरदार खान पठाण वय ५८, रा. आजमशाहिपुरा, खुलताबाद यांचे जफर कापडाचे दुकान आहे. रविवारी रात्री सुमारे ११.२० वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेले आढळून आले. दुकानातील रोकड तपासली असता तब्बल १ लाख ६० हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, कापड दुकानापासून काही अंतरावर काँग्रेस शहराध्यक्ष मजीद मणियार यांचे सना मेडिकल दुकान आहे. चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश केला. येथूनही अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही दुकानांतून सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे.
घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी झाले. पोलिसांनी दुकानांची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये संशयित चोरटे स्पष्टपणे दिसून येत असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले होते.


No Comment! Be the first one.