दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना दुर्घटना; कॉलम फोडताना अंगावर कोसळला; सुरक्षा किट नसल्याचा नातेवाईकांचा दावा
घनसावंगी प्रतिनिधी : अविनाश घोगरे
घनसावंगी : पंचायत समितीच्या नवीन इमारतीवरील दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना जुना सिमेंटचा कॉलम फोडण्याचे काम करणाऱ्या ३४ वर्षीय कामगाराच्या अंगावर अचानक कॉलम कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घनसावंगी येथे घडली. आनंद अशोक भरपूर (वय ३४, रा. रूई, ता. अंबड) असे मृत कामगाराचे नाव आहे.
घनसावंगी पंचायत समितीच्या इमारतीवरील दुसऱ्या मजल्याचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. या कामासाठी अंबड तालुक्यातील रूई येथील चार ते पाच मजूर रोजंदारीवर काम करीत असल्याची माहिती आहे. रविवारीही आनंद भरपूर हे अन्य सहकाऱ्यांसोबत बांधकामाच्या ठिकाणी कामावर आले होते.
बांधकाम सुरू असताना इमारतीवरील जुना सिमेंटचा कॉलम फोडण्याचे काम आनंद भरपूर करीत होते. याचवेळी अचानक कॉलम त्यांच्या अंगावर कोसळला. कॉलमखाली दबून गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस प्रशासनानेही घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली.
सुरक्षा किट नसल्याचा नातेवाईकांचा दावा
या दुर्घटनेनंतर बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मृत कामगाराच्या नातेवाईकांनी कामगारांना आवश्यक सुरक्षा किट व इतर सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा दावा केला आहे. जुना कॉलम फोडण्यासारखे धोकादायक काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
जुना कॉलम फोडण्यापूर्वी त्याची सुरक्षितता तपासण्यात आली होती का? कॉलम पाडण्याची तांत्रिक प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली होती का? कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाले आहेत.
रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
दुर्घटनेनंतर मृत कामगाराच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला नव्हता.
दरम्यान, तहसीलदार रमेश पागोटे यांनी नातेवाईकांशी मध्यस्थी करून चर्चा केली. प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तसेच दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर प्रकरणातील तणाव निवळला.
बांधकामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
जुना सिमेंटचा कॉलम फोडताना तो अचानक कोसळल्याने पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कॉलमची स्थिती, तो पाडण्याची पद्धत, बांधकामस्थळी करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजना तसेच कामगारांना उपलब्ध करून देण्यात आलेली सुरक्षा साधने यांची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
कॉलम नेमक्या कोणत्या कारणामुळे कोसळला, बांधकामस्थळी सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का आणि दुर्घटनेस नेमकी कोणती बाब कारणीभूत ठरली, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
आनंद अशोक भरपूर यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व कुटुंबीय असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने भरपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत कामगाराच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
सखोल चौकशीची मागणी
या दुर्घटनेची निष्पक्ष व तांत्रिक चौकशी करून कामगाराच्या मृत्यूमागील नेमकी कारणे स्पष्ट करावीत, बांधकामस्थळी सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांकडून करण्यात आली आहे.

No Comment! Be the first one.